1969 सालची गोष्ट कै. किसनराव साबळे- पाटील [दादा] यांच्या प्रेरणेने शिवथर गावात ‘यशवंत शिक्षण संस्था’ वीरबाग सुरुर संस्थापित शिवथर हायस्कूल शिवथर नावाचे हायस्कूल सुरु झाले. पहिल्या वर्षी आठवीचा वर्ग सुरु झाला. एका खाजगी मालकाच्या घरातील माडीवर तो वर्ग भरत होता. कार्यालय लक्ष्मीआईच्या मंदिरात सुरु झाले. इयत्ता 7 वी नंतर गावातील मुला- मुलींना वडूथ, सातारारोड,सातारा किंवा अन्य नातेवाईकांकडे शिक्षणासाठी जावे लागत होते. आता गावातच हायस्कूल सुरु झाल्याने सर्व सामान्यांची मुले ही माध्यमिक शिक्षण घेऊ लागली याचा सर्वांनाच आनंद झाला.विशेषतः 7वी नंतर मुलींचे पालक मुलींना शिक्षणासाठी परगावी पाठ्वत नव्हते. त्या मुलींच्या शिक्षणाची उपेक्षा होत होती. शिक्षणाने गावात परिवर्तनाची लाट सुरु झाली.
सन १९७० च्या जून महिन्यात ८ चा वर्ग खाजगी मालकाच्या माडीवर सुरू झाला. तेथील वर्ग लक्ष्मी आईच्या मंदिरात स्थलांतरित केला. शिक्षकांच्या खोलीचा प्रश्न उभा राहिला. गावात कोठेच जागा मिळेनाशी झाली. खुर्द सर चिट्णीस सर व दादांच्या सहकार्याने तसेच गावातील ग्रामस्थांच्या समंतीने हायस्कूलचे वर्ग शिवथर- आरफळच्या मध्यावर अमेरिकेत मिशन ‘ संचलित कुष्ठरोग्यांच्या बंद पडलेल्या दवाखाण्याच्या इमारतीत भरवण्याचे ठरले. त्यावेळी सदर इमारतीत वर्ग भरवायला काही पालकांनी नकार दिला, पाल्यांना शाळेत पाठवायला पालक तयार होईनात. काही मुले पुन्हा इतरत्र जाऊ लागली तरीही एक दिवस सगळे वर्ग, कार्यालय,स्टाफरूम सदर दवाखान्याच्या इमारतीमध्ये सुरू झाले.तत्पूर्वी संपूर्ण इमारत आम्ही मुलांनी साफ करून धुवून घेतली.
ब-याच दिवसांची विद्यार्थांची शिक्षणासाठी करावी लागणारी पायपीट बंद झाली. त्यावेळचे संस्थापक, अध्यक्ष मा. किसनवीर (आबा), मा. सचिव, बा. ना. चिटणीस, इतर संचालक व दादां यांच्या आशिर्वादाने ही ज्ञानगंगा शिवथर व आरफळच्या घराघरात पोहचली. इ ८वी त इ११वी पर्यंतचे वर्ग सुरू झाले. हळूहळू शाळेची प्रगती होऊ लागली.
शासनाच्या नवीन निर्णयानुसार इयत्ता ५वी पासुनचे पुढचे ही वर्ग हायस्कूलला जोडावे असे ठरले. आणि १९७७ मध्ये इ ५ वीचा ही वर्ग सुरू करण्यात आला.असे करता करता ५वी ते नवीन १० वी पर्यंत असे एकूण 6 वर्ग निघाले.
गुणवत्ता वाढू लागली. परिसरातील मुलांची प्रवेशासाठी गर्दी होऊ लागली. तुकड्या वाढू लागल्या आणि ही सुद्धा इमारत अपुरी पडू लागली. ही इमारत दवाखान्याची असल्यामुळे खोल्या अत्यंत छोट्या होत्या. वर्ग बसू शकत नव्ह्ते. त्यावेळ्चे मुख्याध्यापक व आम्ही सर्व शिक्षक सेवकांच्या मदतीने मधल्या भिंती काढून पुरेसे वर्ग केले. हळूहळू शाळेचा नावलौकिक वाढू लागला. शिवथर, आरफळ, अंबवडे, रेवडी, न्हाळेवाडी, इ. परिसरातील मुले शाळेत प्रवेश घेऊ लागली. त्यामुळे वर्ग खोल्या आणखीच अपुर्या पडू लागल्या. नवीन खोल्या बांधण्याशिवाय पर्यायच नव्हता. पण तांत्रिक व कायदेशीर अडचणीमुळे त्यावेळी तेही करता येत नव्हते.
इमारत विस्ताराची अडचण लक्षात घेता. संस्था पातळीवर व्यवस्थपनाने शाळा दुबार भरवण्याचा निर्णय घेतला.सन 1979 ते सन 2006 पर्यंत 27 वर्षे भरत होते. दरम्याच्या काळात शाळेची कारखान्यासारखी अवस्था झाली. विद्यार्थ्यांना इच्छा असून सुध्दा पुरेसावेळ अध्ययनासाठी पुरेसा मिळत नव्हता. शिक्षकांनाही अध्यापन प्रकियेत अडचणी येत होत्या. तरीही जास्तीत जास्त प्रयत्न येणार्या अडचणीवर मात करीत, शैक्षणिक कामकाज चालूच होते. दरवर्षी होणार्या वार्षिक तपासणीमध्ये मा. शिक्षणाधिकारी इमारतीचा प्रश्न सोडविण्यासाठी आवाहन करीत असत. आम्ही सुद्धा स्नेहसंमेलने, सभा,मेळावे यातून ग्रामस्थ व पालकांना आवाहन करुन इमारतीचा प्रश्न सोड्विण्याचा प्रयत्न करीत होतो. प्रत्येक जण मद्तीचा हात पुढे करीत होता. परंतु तेही प्रयत्न अपुरेच पडत होते.
इकडे शाळेची घौड्दौड चालूच होती. स्कॉलरशिप, चित्रकला, हिंदी, इंग्रजी, इत्यादी विषयासारख्या बाह्य परिक्षेत विद्यार्थी चमकत होते. क्रीडा स्पर्धेमध्ये तर जवळजवळ सर्व गटामध्ये मुलींच्या ‘कबड्डी’ संघाला सातारा जिल्हयात सलग 5 ते 6 वर्षे अजिंक्य पद होते.
दरम्यान संस्थेचे विद्यमान सचिव मा. अॅड. अरविंदरावजी चव्हण व संचालक मा. किरण साबळे- पाटिल यांच्या पुढाकाराने हायस्कुलची नवीन विस्तारीत इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. मा. अरविंदरावजी चव्हाण (तात्या) यांच्या पुढाकाराने या निर्णयाची अंमलबजावनी करण्यास गती मिळाली.मा.किरण साबळे-पाटिल (नाना) यांनी इमारतिचा विषय मनावर घेतला.
कै.स्वा.से. किसनराव साबळे – पाटिल अर्थातच दादांचे आशीर्वाद घेऊन इमारतीचे बांधकाम सुरू झाले. शिवथर आरफळ मधील शेकडो लोकांनी मदतीचा हात दिला. कै. किसनराव साबळे- पाटील वि.का.स.सेवा सोसायटी, माजी आरटीओ मा.बबनराव पवार, विज अभियंता मा.युवराज पवार, दादांचे जावई मा.तुकाराम चव्हाण इत्यादी मान्यवरांच्या भरघोस अर्थसाह्याने हातभार दिला. मा. किरण नानांच्या उदार व उदात्त भावनेला त्यांच्या मातोश्रींना तसेच त्यांचे बंधू श्री. प्रदिप साबळे पाटील (भाऊ) यांनी उचलूंन धरले. उर्वरीत संपूर्ण भाराचे हे ‘ सुदर्शन ‘ नानांनी स्वत;च्या बाहुंनी पेलले ते पूर्णत्वास नेले. कित्येक दिवसांचे गावकर्यांचे, शिवथर,आरफळ परिसरातील शिक्षण प्रेमींचे स्वप्न साकार झाले.
शिवथर हायस्कूल शिवथर-आरफळ च्या या शैक्षणिक संकुलाच्या विकासासाठी इतर अनेक दानशूर मंडळींनी,आजी,माजी विद्यार्थ्यांनी,नांनाच्या इतर नातेवाईकांनी शिवथर-आरफळ मधील विविध संस्थांनी,शिक्षणप्रेमींनी मंडळांनी वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला आहे.